Wednesday, January 31, 2018

31 जानेवारी 2018 चे चंद्रग्रहण - काही 'वेगळ्या' अंधश्रद्धा


31 जानेवारी 2018 रोजी खगोलप्रेमींसाठी पर्वणी होती. कारण त्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण , ब्लु मुन डे आणि सुपरमुन असा तिहेरी योग जुळून आला. या ग्रहणकाळात अनेक अंधश्रद्धा दिसल्या. अनेकदा दिसतात. मी  सर्वसामान्य म्हणजे या काळात काही खाऊ नये , दान करावे , बाहेर पडू नये वगैरे अंधश्रद्धांबद्दल बोलत नाहीये. त्यावर बर्‍याच जणांच बोलून झालय आणि बोलतही आहेत. एवढे सगळे प्रयत्न होऊनही 'कळतं पण वळत नाही' अशी समाजाची स्थिती आहे. या छोट्याश्या लेखात मी त्याविषयी नाही तर काही 'वेगळ्या' थोड्याश्या खगोलीय अंधश्रद्धांविषयी बोलणार आहे.

1. निळा चंद्र : ही सर्वात मोठी अंधश्रद्धा . 'ब्लु मुन' ही टर्म पाहून लोक असा समज करून घेतात. पण  ब्लु मुन म्हणजे चंद्र निळा दिसत नाही. तर ब्लु मुन म्हणजे दोन पौर्णिमांचा महिना असलेला दिवस. म्हणजे ज्या महिन्यात दोन पौर्णिमा असतात त्याच्या दुसर्‍या पौर्णिमेला ब्लु मुन डे म्हणतात. त्या दिवशी चंद्र निळा दिसत नाही. काही लोककथांमध्ये निळ्या चंद्राचा उल्लेख आहे. पण त्याचा याच्याशी काही संबंध नाही.

2. इंद्रधंनुषी चंद्र : काही जणांचा असा समज होता की चंद्र अनेक रंगांच्या छटा दाखवणार. पण तसं झाल नाही.  चंद्र  लालच दिसला. याच कारण काय ?

3. लाल चंद्र : ग्रहण काळात चंद्र लाल दिसतो. चंद्रग्रहणात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. पृथ्वी सूर्य आणि  चंद्राच्या मध्ये आल्यामुळे पृथ्वीच्या वातावरणातून  सूर्याची किरणे विखुरली गेल्यासारखी होतात. पण या सर्व रंगांमध्ये लाल रंगाची तरंगलांबी सर्वात जास्त असते. त्यामुळे सर्वात कमी विखुरला जातो . म्हणूनच तो रंग एरवीही उठून दिसतो. चंद्रग्रहणातही हेच होतं. याच कारणाने वर म्हणल्याप्रमाणे चंद्र  अनेक रंगांच्या छटा दाखवत नाही.

4. कालावधी : काही जणांना असे वाटले की आता ब्ल्यु मून , सुपर मून आणि ग्रहण हा योग आता 150 वर्षांनीच परत दिसणार. पण तसं नाही. याआधी मात्र ही घटना 150 वर्षांपूर्वी घडली होती. पण यानंतर मात्र 31 डिसेंबर 2028 ला हाच योग पुन्हा येणार आहे. त्यामुळे अनेकांना तो परत बघता येईल.

5. सुपरमून- सुपरमून म्हणजे  ज्यावेळी पृथ्वी आणि चंद्र यांच्यातलं अंतर सर्वात कमी असतं. त्यावेळी चंद्र आपल्याला अर्थातच मोठा दिसतो.

6. चंद्रग्रहण कसे पहावे : बर्‍याच लोकांना ही गोष्ट हास्यास्पद वाटेल पण काही जणांना चंद्रग्रहण  नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार नाही , डोळ्याला त्रास होईल असे वाटते. पण हे सूर्याच्या बाबतीत खरे आहे . सूर्यातून हानिकारक किरण येत असतात. त्यामुळे सूर्यग्रहण नुसत्या डोळ्यांनी पाहू नये. पण चंद्रग्रहण तसं पाहता येते.

No comments: